
११ आॅक्टोबर २०२०,
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्याने टपरी पथारी हातगाडीधारकांना दहा हजार स्वनिधी म्हणून कर्ज स्वरूपात अर्थसहाय्य केले जात आहे. टपरी–पथारी-हातगाडी पंचायत वतीने पंचायत अध्यक्ष व कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली टपरी-पथारी हातगाडी धारकांना या योजनेचा लाभ दिला जात आहे.
महापालिकेचे नगरवस्ती विभागाचे उपायुक्त अजय चाठणकर यांनी पंचायत कार्यालयास भेट देऊन कामाची पाहणी केली. गोरगरीब फेरीवाल्यांना लाभ मिळत असल्याबाबत संघटनेचे कौतुक केले. योजनेच्या लाभार्थी महिला आणि पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन उपायुक्त अजय चाठणकर यांचा सन्मान केला. यावेळी काजल कांबळे, म.न.पा.चे अधिकारी ज्योती भोसले, राकेश पाटील आदी उपस्थित होते.
कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे माहिती देताना म्हणाले की, केंद्र सरकारने कोविड १९ पार्श्वभूमीवर २० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. पालिकेच्या माध्यमातून टपरी-पथारी-हातगाडीधारकांना दहा हजार स्वनिधी म्हणून कर्ज स्वरूपात अर्थसहाय्य केले जात आहे. पंचायतिच्या वतीने योजना राबविण्यासाठी चांगले काम केले जात आहे. लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी त्याचे ऑनलाइन फॉर्म भरून घेण्यासाठी त्यांना मोफत मदत मार्गदर्शन केले जात आहे.