News14 Pimpri Chinchwad - यांनी लिहिलेले | May 20, 2020

२० मे २०२०,
राज्य सरकारने चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. रेड झोन वगळता इतर झोनमध्ये नव्या नियमावलीत लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. या नियमावलीत पिंपरी चिंचवड महापालिकेला रेड झोनमधून वगळण्यात आले आहे. तथापि, शहरातील ‘कंटेनमेंट झोन’मध्ये मात्र कडक निर्बंध लागू असणार आहेत. २२ मे पासून या नियमावलीनुसार शहरात अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सध्या लॉकडाऊन 4.0 लागू करण्यात आला आहे. राज्य सरकारने आज लॉकडाऊनबाबत नवीन नियमावली जाहीर केली आहे. ही नियमावली २२ ते ३१ मे पर्यंत लागू असणार आहे. नवीन नियमावलीनुसार जी शहरे ‘रेडझोन’ म्हणून घोषित केली आहेत, त्यात पिंपरी चिंचवड शहराचे नाव नाही. मुंबई, नवी मुंबई, पुणे (शहर), सोलापूर (शहर), औरंगाबाद (शहर), मालेगाव, धुळे, नाशिक (शहर), जळगाव, अकोला आणि अमरावती हे परिसर ‘रेडझोन’ म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. उरलेली सर्व क्षेत्र बिगर किंवा नॉन रेड झोन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहर हे नॉन रेडझोन क्षेत्रात समाविष्ट झाले आहे. नव्या नियमावलीमध्ये नॉन रेडझोन क्षेत्रासाठी काही प्रमाणात सूट दिलेली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, राज्य सरकारने पिंपरी चिंचवड शहराला रेड झोनमधून वगळले आहे. आदेशाची अंमलबजावणी २२ मे पासून केली जाणार आहे. त्याबाबतची नियमावली दोन दिवसांत तयार करून अंमलबजावणी केली जाईल.
नॉन रेड झोनमध्ये काय राहणार सुरू…

# स्पोर्टस कॉम्प्लेक्‍स, स्टेडियम, खुल्या जागा वैयक्तिक व्यायामासाठी सुरू राहणार, मात्र सामूहिक जमावाला बंदी# जिल्हांतर्गत बससेवा ५० टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यास परवानगी# सर्व दुकाने आणि बाजारपेठा सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत सुरू राहणार. मात्र गर्दी झाल्यास बंद करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेऊ शकते.# टॅक्‍सी, कॅब व रिक्षा वाहतूक (चालक आणि दोन प्रवासी), दुचाकी वाहने (एक जण), चारचाकी वाहने (एक चालक आणि दोन प्रवासी)# सरकारी व खासगी कार्यालये, उपनिबंधक कार्यालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय# उद्योग, बांधकाम व्यवसाय, बॅंक आणि वित्तसंस्था, कुरिअर आणि पोस्ट सेवा.# रेस्टॉरंटमधून घरपोच पार्सल सेवा# बस, रेल्वे स्टेशनवरील कॅन्टीन
काय राहील बंद..
# शाळा, कॉलेज, महाविद्यालये बंदच राहतील. मात्र, ऑनलाइन वर्ग आणि कोर्स सुरू ठेऊ शकतात.# हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहतील. केवळ पोलीस आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सेवा देणाऱ्या कॅन्टीन सेवा सुरू राहतील.# सिनेमागृह, मॉल्स, जिम, जलतरण तलाव, उद्यान, हॉल्स बंदच राहतील.# कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यावरील बंदी कायम# सर्व धार्मिक स्थळे बंद राहतील.
कंटेनमेंट झोनमध्ये मात्र निर्बंध..
शहरामध्ये सध्या कंटेनमेंट झोन असलेल्या किंवा नव्याने निश्‍चित केल्या जाणाऱ्या क्षेत्रात कडक निर्बंध लागू असणार आहेत. तेथे केवळ अत्यावश्‍यक सेवाच सुरू राहणार आहे. मालवाहतूक, जीवनावश्‍यक वस्तू विक्रीची दुकाने आणि वैद्यकिय तातडीच्या सेवेसाठी ये-जा करण्यास मुभा असणार आहे.

आमच्याशी संपर्क साधा
Call Now