News14 Pimpri Chinchwad - यांनी लिहिलेले | October 11, 2020

११ आॅक्टोबर २०२०,
राज्यात अनेक निर्बंध शिथील करण्यात येत असताना धार्मिक स्थळे कधी उघडणार?, शाळा कधी उघडणार?, व्यायामशाळांना परवानगी कधी मिळणार?, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. या अनुषंगाने या सर्वाबाबत निर्णय प्रक्रियेतील महत्त्वाचे मंत्री असलेले राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना खूप मोठे संकेत दिले आहेत.

राजेश टोपे यांनी अनलॉक प्रक्रियेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा, धार्मिक स्थळे, व्यायामशाळा उघडण्यात येतील आणि नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल, अशी अपेक्षा करूया’, असे वक्तव्य टोपे यांनी माध्यमांशी बोलताना केले. टोपे यांच्या या विधानातून लॉकडाऊनला जवळपास पूर्णविराम मिळू शकतो, असेही संकेत मिळू लागले आहेत.

दरम्यान, राज्यात सध्या अनलॉकचा पाचवा टप्पा सुरू आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवत असताना मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथील करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारचे शटर पुन्हा खुले झाले आहे. ५० टक्के ग्राहक क्षमतेच्या अटीवर हा व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. करोनाच्या अनुषंगाने त्यांना गाइडलाइन्सही देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे राज्यांतर्गत रेल्वे वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. एसटी सोबतच खासगी बस वाहतूकही १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यात आली आहे. त्यात आता धार्मिक स्थळे, शाळा, व्यायामशाळा आणि मुंबईतील लोकलसेवा पूर्ववत कधी होणार, याची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. त्याबाबत विरोधकही सातत्याने मागणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार गंभीरपणे या सर्वाचा विचार करत असून राज्याची त्यादिशेने वाटचाल सुरू झाल्याचे टोपे यांच्या विधानावरून स्पष्ट झाले आहे.

आमच्याशी संपर्क साधा
Call Now