१९ मे २०२०,
अमेरिका आणि ब्राझीलमध्ये अर्ध्यातच लॉकडाउन उठवण्याचे परिणाम आपण पाहत आहोत. मी महाराष्ट्रात अशी परिस्थिती निर्माण होऊ देणार नाही. त्यासाठी मला टीकेचे धनी व्हावे लागले तरी चालेल.
यापूर्वी घरात राहा सुरक्षित राहा, असे म्हटले जात असले तरी आता बाहेर जाताय तर सावधान राहा, असे म्हणत करोनासोबत जगायला शिकायला हवे. ग्रीन झोनमध्ये सर्व व्यवहार हळूहळू सुरू करण्यात येत असून तेथील दुकाने उघडण्यासही परवानगी देण्यात येईल. मात्र रेड झोनमध्ये कोणत्याही स्थितीत लॉकडाउनची काटेकोरपणे अंमलबजावणी यापुढेही सुरूच राहील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी स्पष्ट केले. त्यामुळे बहुतांश राज्यांनी चौथ्या लॉकडाउनमध्ये अनेक निर्बंध शिथील केले असले तरी महाराष्ट्रात सध्या तरी निर्बंधांचेच राज्य राहणार आहे.

लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील लॉकडाउन वाढवण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. ‘अमेरिका आणि ब्राझीलमध्ये अर्ध्यातच लॉकडाउन उठवण्याचे परिणाम आपण पाहत आहोत. मी महाराष्ट्रात अशी परिस्थिती निर्माण होऊ देणार नाही. त्यासाठी मला टीकेचे धनी व्हावे लागले तरी चालेल. समजा आपण मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये लॉकडाउन उठवला तर कामाच्या ठिकाणी श्रमिकांमध्ये करोना पसरण्याची शक्यता आहे. अगोदरच परराज्यातील श्रमिक गावी परतले आहेत. त्यामुळे उर्वरित श्रमिकांमध्येही करोनाची साथ पसरल्यास रेड झोनमध्ये अघोषित लॉकडाउनची परिस्थिती निर्माण होईल’, अशी भीती उद्धव ठाकरे यांनी वर्तविली.

आम्ही परराज्यातील कामगारांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी रेल्वेची व्यवस्था करीत असताना अजूनही काही कामगार पायी चालताना दिसत आहे, मात्र त्यांनी तसे करू नये, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. मुंबई, ठाणे परिसरातून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चाकरमानी मूळ गावी परतत आहेत. त्यांना मुख्यमत्र्यांनी गावी जाण्याची घाई करू नका, अशी विनंती केली. ‘परराज्यांतील ५ लाख श्रमिकांना त्यांच्या गावी परतण्यासाठी सरकारने मदत केली आहे. तुम्ही तर माझे आहात, तुमचीही व्यवस्था केली जाणार आहे. मात्र थोडे दिवस वाट पाहा. करोना विषाणू घेऊन तुम्ही गावी जाऊ नका. तुमच्यामुळे तुमच्या तेथील कुटुंबाला संकटात ढकलू नका’, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

लॉकडाउन उठवायचा तर तो या क्षणीही उठवता येईल, पण लॉकडाउन उठवल्यास काय स्थिती उद्भवेल, याची कल्पना मला आहे. लॉकडाउन उठवून मला महाराष्ट्राला संकटात ढकलायचे नाही. महाराष्ट्रासाठी वाईटपणा घ्यायला मी तयार आहे. टीकेचा धनी झालो तरी मी लॉकडाउन उठवण्याचा निर्णय घाईघाईत घेणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. कोणतीही गोष्ट सुरू करण्यापूर्वी जनतेला कल्पना देऊनच करणार आहोत. याआधी लॉकडाउन उघडला की लोकांची झुंबड उडालेली आपण पाहिली आहे. त्यामुळे नंतर तिथे पुन्हा लॉकडाउन कडक करण्यात आला. त्यामुळे एकदा सुरू केलेली गोष्ट परत बंद करण्याची वेळ येऊ नये अशा पद्धतीने राज्य सरकारला व्यवस्था करायची असल्याचेही त्यांनी सांगितले. जून महिना जवळ येत असल्याने शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. आपल्याला शैक्षणिक वर्ष वाया जाऊ द्यायचे नसून मी तसे होऊ देणार नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हे संकट आपल्याला पावसाळ्यापूर्वी संपवायचे आहे, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आमच्याशी संपर्क साधा
Call Now