News14 Pimpri Chinchwad - यांनी लिहिलेले | May 16, 2020

१६ मे २०२०,
भारत देशातील कोरोना रुग्णांचा आकडा ८१ हजारहून अधिक झाला असून शुक्रवारी तो ८१,९७० इतका होता. गेल्या चोवीस तासांमध्ये ३,९६७ नव्या रुग्णांची भर पडली असून १०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यू २,६४९ झाले आहेत. जगभरात मृत्यूचे प्रमाण ६.९२ टक्के इतके असले तरी भारतात ते सध्या ३.२३ टक्के आहे. एकूण २७,९२० रुग्ण बरे झाले आहेत.

गेल्या चोवीस तासांमध्ये १,६८५ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ३४.०६ टक्के आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.
करोनासंदर्भातील १५ व्या मंत्रिगटाची बैठक शुक्रवारी झाली. ही बैठक केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टाळेबंदीमुळे करोनाच्या रुग्णसंख्या दुप्पट होण्याचे प्रमाण कमी करण्यात यश मिळाले आहे. टाळेबंदी लागू करण्यापूर्वी हे प्रमाण ३.४ दिवस होते पण, आता ते १२.९ दिवसांवर पोहोचले आहे.

देशातील ३० महापालिका क्षेत्रांमध्ये ७९ टक्के करोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यातही मुंबई, ठाणे, पुणे, चेन्नई, दिल्लीतील ११ जिल्हे, गुतरातमधील अहमदाबाद, सुरत आणि बडोदा या शहरांमध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. महाराष्ट्र (२७,५२४), तमिळनाडू (९,६७४), गुजरात (९,५९१), दिल्ली (८,४७०) या चार राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यात प्रतिबंधात्मक उपाय करण्यासंदर्भात प्रामुख्याने मंत्रिगटाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

करोनाचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या शहरांमध्ये केंद्रीय पथके पाठवण्यात आली असून गरजेनुसार या पथकांकडून वारंवार आढावा घेतला जाणार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. स्थलांतरित मजूर आपापल्या गावी जात आहेत तसेच, परदेशातूनही नागरिक परत येत आहेत. त्यामुळे करोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता असून ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यावर लक्ष केंदित केले जाणार आहे.

२० लाख नमुना चाचण्या
आत्तापर्यंत करोनाच्या २० लाख नमुना चाचण्या करण्यात आल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संसोधन संस्थेचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी दिली. देशभरातील ५०९ वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये प्रतिदिन १ लाख चाचण्या करणे शक्य झाले आहे. राष्ट्रीय रोगनियंत्रण केंद्रामध्ये कोबास-६८०० हे स्वयंचलित चाचणी यंत्र बसवण्यात आले असून प्रतिदिन १२०० चाचण्या करता येत आहेत. आतापर्यंत ८४.२२ लाख एन-९५ मास्क व ४७.९८ लाख पीपीआई राज्यांना वाटण्यात आले आहेत. देशांतर्गत स्तरावर प्रतिदिन प्रत्येकी सुमारे ३ लाख पीपीई व एन-९५ मास्क तयार करण्याची क्षमता निर्माण झाली आहे. त्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पुरेशा प्रमाणात त्याचे वाटप केले जाऊ  शकते. देशी बनावटीचे कृत्रिम श्वासोच्छसाची यंत्रेही बनवली जात आहेत, अशीही माहिती देण्यात आली.

आमच्याशी संपर्क साधा
Call Now