News14 Pimpri Chinchwad - यांनी लिहिलेले | March 23, 2020

२३ मार्च २०२०,
पुण्यातील वेल्हे तालुक्यातील पानशेत परिसरात २५ गावांसह ८१ लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. फक्त एका महिलेच्या चुकीमुळे हे सगळं घडलं आहे. ही महिला अंगणवाडी सेविका असून तिने मुंबईतील वाशी ते पुण्याजवळील वेल्हे तालुक्यातील वरसगांव येथे प्रवास केला होता.

जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “अंगणवाडी कर्मचारी असणाऱ्या या महिलेमध्ये करोनाची लक्षणं आढळून आली होती. यानंतर तिला भारती रुग्णालयात दाखल केलं असता लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं. महिला मुळची पुण्याची आहे. मात्र कामानिमित्त ती पानशेत धरणाशेजारी असणाऱ्या वरसगाव येथे ये-जा करते. महिलेने खूप प्रवास केलेला असून नेमकी तिला कुठे लागण झाली याची माहिती आम्ही घेत आहोत”.

“वरसगाव येथे आम्ही पूर्वकाळजी म्हणून कंटेटमेंट झोन तयार केला आहे. हे क्षेत्र बाधित नसलं तरीही आपण निष्काळजीपणा करु शकत नाही. त्यामुळेच तिथे कंटेटमेंट झोन तयार करण्यात आला आहे,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

४८ ग्रामपंचायती आणि महिलेच्या संपर्कात आलेल्या जवळपास ८१ लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आली असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. क्वारंटाइन करण्यात आलेल्या ८१ लोकांच्या हातावर शिक्का मारुन त्यांना घरीच बसवण्यात आलं आहे. त्यांच्यावर वैद्यकीय टीम सतत लक्ष ठेवून आहे असंही यावेळी त्यांनी सांगितलं. दरम्यान सुरक्षेचा भाग म्हणून पानशेतला जाणारा रस्ता बंद करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.

आमच्याशी संपर्क साधा
Call Now