२० मे २०२०,
किराणा मालाची दुकाने सुरू ठेवावीत तसेच आम्हाला महापालिकेने अन्नधान्य पुरवावे, या मागणीसाठी शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले. बुधवारी (दि. २०) दुपारी चिंचवड स्टेशन पेट्रोल पंपा समोरील प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या आनंदनगरमध्ये शेकडो महिला, पुरुष रस्त्यावर आले आणि गोंधळ सुरू झाला. वेळीच पोलिसांची कुमक आल्याने वातावरण निवळले.

बहुसंख्य कंत्राटी कामगार, घरकाम करणाऱ्या महिला, बांधकाम मजूरांची वस्ती असलेल्या आनंदनगरमध्ये ३० हून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे हा परिसर महापालिकेच्यावतीने सर्व बाजुंनी पत्रे ठोकून सील करण्यात आला आहे. हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याने या भागातील सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत.दुकाने बंद असल्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, असे म्हणत शेकडो नागरिक बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास रस्त्यावर उतरले. आम्हाला महापालिकेने अन्नधान्य पुरवावे, किराणा मालाची दुकाने सुरू ठेवावीत, अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली. यावेळी काही जणांनी हुल्लडबाजी केली. मात्र त्यांना इतर नागरिकांनी वेळीच रोखल्याने पुढील अनर्थ टळला. सर्व नागरिकांना महापालिकेच्यावतीने जेवण देण्यात येईल. तसेच किराणा माल व राशनची दुकानेही सुरू ठेवण्यात येतील, असे आश्वासन दिल्यानंतर हा जमाव पांगला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर हे स्वतः आनंदनगरमध्ये दाखल झाले होते. त्यांनी परिसरातील नागरिकांसोबत चर्चा केली. पोलिसांनी लोकांना शांत करण्यासाठी प्रयत्न केले. सर्व दुकाने सुरू राहतील, घरपोच जेवण महापालिकेकडून दिले जाईल, असे जाहिर केल्यानंतर जमाव पांगला.

आनंदनगर परिसरात दोन हजार ३०० घरे असून १० हजार नागरिक राहतात. मोठ्या प्रमाणात करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे अशा प्रकारचा जमाव रस्त्यावर उतरल्याने करोना प्रसाराचा धोका निर्माण झाला आहे. यापैकी अनेकांनी तोंडावर मास्कही बांधलेले नव्हते.दलित पँन्थरचे नेते रामचंद्र माने म्हणाले, जेवण वाटपाबाबत वारंवार पत्रव्यवहार केला, तेव्हा महापालिका प्रशानाने दुर्लक्ष केले. ३ हजारावर कुटुंब इथे असताना उगाच १००-२०० लोकांना जेवण वाटप केले जायचे. त्यात डाळ भाताचे पॅकेट असते. इथे शारिरीक कष्ठ करणारे लोक राहतात. त्यांचे जेवण मजबूत असते. पालिकेच्या पॅकेजने कोणाचेच पोट भरत नाही. त्यात रेशन दुकानदारांचा भ्रष्ट कारभार, पुरवठा अधिकाऱ्यांचे तिकडे होणारे दुर्लक्ष यामुळे लोक त्रासले आणि रस्त्यावर आले. सर्वांना दोन वेळचे जेवण तसेच रेशन पुरवले तर पुन्हा अशी परिस्थिती उद्धभवनार नाही.

आमच्याशी संपर्क साधा
Call Now